Thursday, 22 September 2016

धुक्यात अनुभवलेला स्वर्गीय राजगड!!

                                                                                                                                                                     
                        तारीख २६ ऑगस्ट. संध्याकाळची वेळ. २७ ला शनिवारची सुट्टी. मग काय फोना-फोनी झाली अन चार मित्र तयार झाले.  राजगड night trek चा प्लॅन ठरला.रात्री ९:३० ला पुण्यातुन बाहेर पडलो. राजगडला पाली दरवाजामार्गे जाणार होतो. म्हणजे पायथ्याच्या वाजेघरला गाडी लावावी लागणार होती. वाजेघर जवळ पोहोचेपर्यंत ११ वाजत आले. राजगड जवळ येत होता तसं धुकं वाढत होतं. आधीच अंधार. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून ट्रेक करायचं ठरवलं.  ह्या धुक्यात अंधारात रात्र कुठे घालवणार? मोठी पंचाईत! पाऊस हि चालू होता बारीक बारीक. वाजेघर आधी एक गाव लागतं. तिथे मंदिर काही सापडलं  नाही.एक घर होता दुमजली. त्याच्या खाली दोन दुकानं  होती. दुकानांसमोर प्रशस्त जागा होती अन वर पत्र्याचं छप्पर. मग काय sleeping bags, अंथरूण पांघरून काढून तिथेच पहुडलो. धुक्याच्या पांघरुणात गाव एकदम चिडीचूप झोपलेलं. घरांमध्ये कोणी आहेच का असा प्रश्न पडावा इतकी शांतता. फक्त पावसाच्या थेंबांचा पत्र्यावर पडून होणारा टपटप आवाज. एवढ्या पावसापाण्यात घरी झोपायचं सोडून इकडे आलो यावर स्वतःवरच हसलो!! 

                                       पहाटेच उठलो ६ वाजता अन तडक गडाकडे निघालो. पालीचा रस्ता कच्चा असल्यामुळे पूर्ण चिखलमय झाला होता. पठारावरच्या पार्किंगपर्यंत गाडी चालवणं अशक्य. मग अर्ध्यारस्त्यात एक घर लागलं. त्याच्यापुढे गाडी लावून चालू लागलो. पहाट  झाली तरी धुकं तेवढंच घनदाट होतं. सारा आसमंत धुक्याची रजई  घेऊन पहुडला होता. उजाडायची काही घाई नव्हती. भूर भूर पाऊस चालू होता. बर्फवृष्टीसारखा!! सगळ्या झाडांची पानं दवबिंदूंनी झाकलेली. थोड्यात वेळात ट्रेकचा रस्ता सुरु झाला. धुक्यात आसपासचा दिसत होतं फक्त. सगळीकडे रानफुले फुललेली. उतारांवर  कारवीची दाट जाळी.


                                      पानांवरच काय कोळ्याच्या जाळ्यावर सुद्धा दवबिंदू होते!


                             पाली दरवाज्याने अर्ध्या रस्त्यात पायऱ्या लागतात. मोठमोठ्याल्या पायऱ्या. एक एक दगड हा येवडा मोठा. त्या काळात हे इथे आणले कशे आणले अन रचले असतील हा नेहमीचा प्रश्न मला सतावत होता. रस्ता संपतो अन पुढ्यात पाली दरवाजा येतो. थक्कं करायला लावणारा! येवडा भव्य दरवाजा पण जवळ आल्याशिवाय शत्रूला दिसणार नाही अशी रचना. शिवाजी  महाराजांच्या बऱ्याच किल्ल्यांवर अशी रचना आहे.



                             पाली दरवाज्याच्या मार्गात लागणाऱ्या पायऱ्या धुक्यात हरवल्या होत्या!



                                           काळ्याशार रंगांचा भव्य पाली दरवाजा!
                       
                 
                       श्रावण संपत आलेला. जोरदार पावसाचा काळ संपलेला. सगळीकडे हिरवळ अन त्यात डोलणारी रानफुले! श्रावण नंतर येईल भाद्रपद. पोळ्यापासून भाद्रपद सुरु होतो. भाद्रपदात गणपती अन महालक्ष्मी बसतात. हिंदू सणांची एक वेगळीच मजा असते. आपले सण-उत्सव हे ऋतुचक्र आणि शेतीचक्राशी जोडलेली असतात. गणपतीला आपण तेरडा, चावर इत्यादी अनेक फुले वाहतो. तेरडा तर गणपतीला अतिप्रिय!

डोंगर उतारांवर उगवलेली पांढरी चमकदार चावर. केळीसारखी पाने असणारी ही लांब फुले गणपती अन लक्ष्मीला वाहिली जातात. (chavar / hitchenia caulina)



    
              पाली दरवाज्यातून आत आल्यावर पद्मावती माची लागते. पद्मावतीवर उगवलेले निळ्याशार रंगाचे "काळी निसूर्डी'' ची फुले. ह्या फुलाला काळी का म्हणतात? कोणास ठाऊक! 
पद्मावती तलावावर थोडा थांबलो. धुक्यात तलाव म्हणजे देवतांचा कुंडच वाटत होता.

काळी निसूर्डी! (kali nisurdi / adelocaryum malabaricum)

                   
                   थोडा वेळ का होईना धुकं सरावं असं इच्छा होती. तोच काय धुकं एकदम  बाजूला झालं आणि आसपासचे हिरवेगार डोंगर उन्हात चमकू लागले! अगदी तोरणाची बुधला माचीचा अंगठ्यासारखा सुळकाही  दिसला!! सकाळच्या कोवळ्या उन्हात सगळा आसमंत न्हाऊन निघाला. पण हे सर्व काहीच क्षण.निसर्ग पुन्हा एकदा धुक्याची तलम चादर घेऊन गपगार पहुडला!



                                              धुकं कमी झाल्यावर दिसलेलं दृश्य!

                 
                               मग बालेकिल्ल्याचा रस्ता धरला. इथे धुकं अधिकच गडद. बालेकिल्ला म्हणजे वर आलेला एक छोटा डोंगरच. सरळ उंच कडे अन त्याच्या खालून जाणारी वाट. ह्या उभ्या दगडांवर एक विशिष्ट फुल येत! पाण तेरडा! कदाचित पाण्यात येणारे असावे म्हणून पाण तेरडा! सगळा खडक ह्या फुलांमुळे गुलाबी दिसत होता. फक्त ओल्या खडकांवर अन धबधब्यांमध्ये ही फुले येतात. प्रत्येक फुलाचं एक विशिष्ट ecosystem ठरलेलं. ती तिथेच सापडणार! सह्याद्री मध्ये अनेक प्रकारची ecosystems आहेत. डोंगर उतार, पठार, धबधबे, नद्या, घनदाट जंगले, गवताळ कुरणे असा सगळा पसारा. अन हे सगळं कमी अंतरावर. सह्याद्रीत रानफुलांच्या एवढ्या प्रजाती असण्याचं हे एक कारण! 


                                                              पाण तेरडा! (pan terda / impatiens acaulis)



                                       फक्त ओल्या खडकांवर अन धबधब्यांमध्ये ही फुले येतात. 

                               
                                    बालेकिल्ल्यावर गेलो. तिथे काहीच दिसत नव्हतं. सगळं धुईखाली झाकलेलं. पण वरचं चंद्रकोर तळे मात्र धुक्यात अधिकच सुंदर दिसत होतं. वाऱ्यामुळे पाण्यात अलगद लाटा उठत होत्या. काही वेळ तिथेच बसलो. शांतता अनुभवत. माळ किंवा टोपली कारवी बालेकिल्ला चा पठार सजवत होती. उलट्या टोपलीच्या आकाराचं हे झाड अत्यंत सुंदर दिसतं. ७ वर्षातून एकदाच माळ कारवी फुलते!



                                      उलट्या टोपलीच्या आकाराची माळ किंवा टोपली कारवी! (malkarvi/ topli karvi / pleocaulus ritchei)

                     काही वेळाने बालेकिल्ला उतरलो. पद्मावतीवर मस्त नाश्ता केला. गरम पोहे अन चहा!! अन पद्मावती मंदिरात जाऊन बसलो. आत छान उबदार वाटत होतं. मंदिराच्या उघड्या दरवाज्यातून सुद्धा धुकं आत येत होतं! बराच वेळ बसलो. धुकं काही हटलं नाही. मग सुवेळा अन संजीवनी माचीवर जायचा plan cancel करून गड उतरायला चालू केलं!

1 comment:

  1. You give a feeling of as if iam roaming on that place.. excellent... Awaiting ur next post

    ReplyDelete